मऊ-नाजूक तजेलदार त्वचेचं एक घरेलू रहस्य
लग्नाच्या दिवशी प्रत्येकीलाच स्पेशल दिसायचं असतं. पण असा स्पेशल लूक काही चार-आठ दिवसांच्या पार्लरमधल्या धावपळीनं मिळत नाही.त्यासाठी घरच्या घरी रोज काहीतरी खास करायला हवं!
----------------------------
एकेकाळी राजकुमारीला किंवा राणीला छान गुलाबाच्या पाकळ्या मिसळलेल्या दुधानं अंघोळ घातली जात असे. त्या अंघोळीनंतर राजकन्येचं किंवा राणीचं सौंदर्य आणखीनच लखलखू लागे. ऐतिहासिक मालिकेतलं किंवा चित्रपटातलं हे हेवा वाटायला लावणारं नेहमीचं दृश्य.
पण अशी दुधा-मधानं अंघोळ आताच्या काळात करायला ना आपल्याकडे स्वस्ताई आहे, ना इतका वेळ. मग इच्छा असूनही कसं दिसणार एखाद्या राजकुमारीसारखं सुंदर.
पण अशी इच्छा एकदा तरी होते आणि त्यासाठी दोन-तीन दिवस सलग पार्लर गाठलं जातं. लग्न ठरलेल्या कोणत्याही मुलीची सुंदर दिसण्याची, लग्नाच्या दिवशी स्पेशल दिसण्याची तीव्र इच्छा असते. त्यासाठी लग्नाच्या अगदी आठ-दहा दिवस आधी ती त्यासाठी प्रयत्नही करायला सुरुवात करते. पण स्पेशल डेच्या स्पेशल लूकसाठी असे आठ-दहा दिवसांचे प्रयत्न कसे पुरतील?
हल्ली लग्नाच्या बाबतीत मुली खूपच ‘चूझी’ झालेल्या आहेत. लग्नाच्या दिवशी पेहराव कोणता हवा, केशभूषा कशी करावी, ज्वेलरी कोणती घालावी, पायातल्या चपला, नेलपेंट ते लिपस्टिक अशा प्रत्येक गोष्टीत त्यांची स्वत:ची चॉइस असते. मात्र स्वत:च्या लूकबद्दल जागरूक असणं म्हणजे महागडे कॉस्मेटिक्स वापरणं किंवा पार्लरमधे ब्यूटी ट्रीटमेंट्स घेणं इतकंच नव्हे. खरंतर यापलीकडे जाऊन करण्याच्या अनेक गोष्टी असतात. त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या त्वचेचे लाड. आणि ते फक्त चेह:याच्याच त्वचेचे करायचे असं नाही. संपूर्ण शरीराच्या त्वचेला मऊ मुलायम आणि तजेलदार फील द्यायचा असेल तर लग्नाच्या किमान तीन चार महिने आधीपासून प्रयत्न करावे लागतात. लाडाकोडानं काळजी घेतलेली त्वचा मग लग्नाच्या दिवशी अशी उजळते की आपल्याला आपण खरंच एखाद्या राजकुमारीसारखेच भासतो.
त्वचेला लाडाकोडानं जपणारा मसुराचा बॉडी स्क्रब
अंघोळीच्या वेळेस मसुराच्या बॉडी स्क्रबनं शरीराला मसाज केला आणि हा नियम जर सलग तीन चार महिने रोज पाळला तर संपूर्ण शरीराची त्वचा मऊसूत, ताजीतवानी आणि तजेलदार होतेच. मसुराचा बॉडी स्क्रब तयार करण्यासाठी एक कप हिरवे आणि लाल मसूर घ्यावेत. ते धुवावेत. सलग तीन दिवस ते उन्हात वाळवावे. आणि एक कप बदाम टाकून मिक्सरमधून मऊसर बारीक वाटून घ्यावेत. ही पावडर फ्रीजमध्ये ठेवावी.
अंघोळीच्या आधी अर्धा कप मसूर बदामाची पावडर, पाव कप ओटमिल आवडर, पाव चमचा सेंद्रिय हळद, पाव कप संत्र्याचा रस आणि पाव कप बदामाचं तेल घ्यावं. हे सर्व एकत्र करावं. ते चांगलं मिळून येण्यासाठी त्यात थोडं दूध घालावं. तयार झालेला लेप मग संपूर्ण शरीराला मसाज करत लावावा. हा लेप पाच मिनिटं सुकू द्यावा. आणि नंतर गरम दूधानं आणि पाण्यानं धुवून काढावा.
No comments:
Post a Comment